स्वगत.....जगण्याचा प्रश्न ...!


बऱ्याच गोष्टींविषयी लिहियाचं म्हणता म्हणता कायमच लिहणं राहुन जातं म्हणुन आज मुद्दाम ठरवुन लिहायला बसलोय .... पण न सुचणं.. न लिहिणं हे देखील साहजिकच आहे ......कारण या माणसांच्या गर्दीत कधी मनातल्या भावना उमलत नाहीत ... अन शब्द बनून फुलत देखील नाहीत ...त्याकरिता एकांताची उब हवी असते ...समाधानाची गर्द साउली हवी असते. असो.... अखेर आज श्रीगणेशा झाला खरा...काहीशा स्वगतामधून, होप सो... तुम्हीहि या विचारांशी ...या भावनांशी स्वतःला रीलेट करू शकाल..


  अनेक विषय आहेत ... ज्यांबद्दल बोलायचं आहे ... जगाला ओरडून सांगायचं आहे, की…. नाही .. हे असं नाही ... हा मार्ग चुकलेला आहे ... पण वास्तवाची चपराक पुन्हा पुन्हा ... मला त्याच अनोळखी अन भूरसट आयुष्यात खेचुन आणते... अर्थात हे वास्तव म्हणजे खरचं सत्य आहे असही नाही ..याउलट हा सत्याचा विपर्यास आहे ..... “चलता है...” म्हणणाऱ्या .... भावनाशुन्य लोकांनी ... त्यांच्यासारख्याच लोकांसाठी योजलेला हा सो कोल्ड फार्स आहे .... परंतु मी या साच्यात तितकासा नीट बसत नाही ... अन म्हणुनच कदाचित... मी त्यांच्या लेखी नालायक देखील ठरत असेन... परंतु ठीक आहे .. हा नालायकपणा मला मान्य आहे ... अन तो मी स्वतः स्वीकारलाय. माहीत नसणाऱ्या गोष्टींना ... माहित नाही असं सांगणं... हा जर कमीपणा असेल ... अन असं सांगण्याने कोणाच्या व्यक्तित्वाचे आयाम कोते होत असतील तर हो ...मी आहे कोत्या मनाचा ...तर हो मी आहे कोत्या व्यक्तित्वाचा... पण काही असो माझ्या या विश्वात मी खुष आहे. एखादी संज्ञा ... एखादी व्याख्या मुखोद्गत करून ... ज्ञानी असण्याचा आव आणणं मला जमत नाही अन कधी जमणार हि नाही. या तथाकथित शिक्षण महर्षींनी चालवलेला शिक्षणाचा बाजारही .. मला नाही बघवत ... अन तो मला कधीच पटणार देखील नाही. दोन वेळच्या भाकरीचाच प्रश्न असेल तर रस्त्यावर भिक मागणाराही त्याचं पोट भरतोच की ... मग त्या भिकाऱ्यात आणि सुटाबुटात फिरणाऱ्या अन स्वतःला विकून ...दुसऱ्याचे तळवे  चाटणाऱ्या सो कोल्ड ... बुद्धीजीवींमध्ये फरक तो काय ?.... अर्थात ... एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात .... अगदी १०० % असू शकतात... परंतु दृष्टीकोन ठेवण्याकरिता ..... बाळगण्याकरिता आत्मा साफ असावा लागतो .... चारित्र्य नितळ असावं लागतं ते मात्र दिसत नाही ... अर्थात या फुशारक्या मारणारा मी कोण मोठा महात्मा आहे असंही नाही .... मीही साधारण मनुष्यचं .. किंबहुना दर्जा जरा खालचा म्हटलं तरी हरकत नाही .... परंतु माझा नालायकपणा ... माझा नीचपणा मी लपवत नाही.... त्याहूनही पुढे जाऊन तो लपवण्याचा मूर्खपणा मला झेपानारही नाही ..... कारण ... कीड लागताक्षणीच ... तो भाग ... मुळ सांगाड्यापासून अलग करणं आवश्यक असतं .... नाहीतर जगाच्या खोट्या मानमरातबापायी ... पुर्ण आयुष्याला हात धुवून बसावं लागतं हे न समजण्याइतका मी मूर्खही नाही. ओघाओघानेच एक गोष्ट आठवतेय .... सॉक्रेटीसची ...  सॉक्रेटीसला मृत्युदंडाची शिक्षा केली गेली होती ... अन ती कशासाठी ... तर तो प्रस्थापित प्रत्येक गोष्टींना ... हे असं का ? म्हणुन प्रतिप्रश्न करायचा अन मानवी बुद्धीच्या कक्षा रुंदावून अधिक अधिक समतोल अर्थ .... समतोल उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा .... विशेष म्हणजे सॉक्रेटीसचा प्रभाव इतका होता की त्याने ठरवलं असतं ... तर तो ती शिक्षा चुकवू शकला असता ... एक तर आपल्या अनुयायांच्या मदतीने पलायन करून किंवा ...एक पाउल मागे सरून .... प्रस्थापितांची माफी मागुन .... परंतु त्याने परतीचे दोन्हीही पर्याय नाकारले कारण तो म्हणत असे,
“ हे लोक वाट चुकलेले आहेत .... त्यांना ते काय करतायत याची जाणिव नाही .... अन त्याहुनही पुढे ... ते फक्त माझा देह नष्ट करू शकतात ....त्याला कष्ट पोहचवू शकतात .....परंतु माझा विचार .... माझं आत्मरूपी अस्तित्व याला ते ना कष्ट पोहोचवू शकतात ना त्याला नष्ट करू शकतात ....उलट त्यांच्या या कृत्यामुळे .... माझा विचार अधिक अधिक प्रखरतेने .... या भूमंडलावर प्रस्थापित होईल ...”

          
       अन आज हजारो वर्षानंतरसुद्धा आपण पाहतो... की ..तो सॉक्रेटीस जिवंत आहे ... त्याच्या विचारांसहित ..... हा सॉक्रेटीसचाच विचार आहे ज्याने प्लॅटो अन अॅरीस्टॉटल सारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञांच्या विचारांची बैठक पक्की केली अन आधुनिक विज्ञानाचा प्रचंड आणि भक्कम पाया घातला. त्यामुळे आयुष्याच्या या प्रवाहात असचं मोघम वाहत जाण्यापेक्षा .... त्यातल्या त्यात ..... थोड्या प्रयत्नाने .... प्रवाहाला भेदुन आपलं शीर उंच करायला हवं .... वाहणाऱ्या प्रचंड प्रवाहाचा ओघ .... तर्काच्या भेदक नजरेने पुन्हा पुन्हा चाचपून पाहायला हवा .... अन सोबतच किनाऱ्याचा .... स्वतःच्या अस्तित्वाचा .... शोध घ्यायला हवा .... तो किनारा जर प्रवाहाच्या दिशेनेच गवसणार असेल... तर काहीच हरकत नाही ...मग स्वतःला झोकुन देता येईल सर्व शक्तीनिशी.... त्या अनोळखी दिशेने; पण .... पण जर तर्कास... प्रवाहाच्या वेगाचा अन दिसणाऱ्या मार्गाचा तकलादुपणा जाणवत असेल ... तर मात्र सावध व्हा ... अन आपली होडी .... आपलं शीड ....त्या प्रवाहाच्या विरुद्ध नेटाने झोकुन द्या .... नव्याने जिंकण्यासाठी ...अन जिंकता जिंकता मरण्यासाठी ..... कारण.... मित्रांनो हा जन्म पुरुषार्थ करण्यासाठी आहे ... किड्या मुंग्यांसारखं मरण्याकरिता नाही.

Comments

Popular Posts